“तुमच्या पराभवाला कराराचे नाव देऊ नका”; इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला, ट्रम्प यांचे ‘ते’ दावे फेटाळले !

Foto
तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष इस्लामिक रिव्हॉल्युशन गॉर्ड कोअरच्या खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर्सच्या प्रवक्त्याने अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. “तुमच्या पराभवाला कराराचे नाव देऊ नका,” अशा शब्दात त्यांनी चालू संघर्षादरम्यानच्या घडामोडी हे अमेरिकेचे मोठे राजनैतिक यश असल्याचे दाखवू नये असेही त्यांनी बजावले आहे.

“प्रदेशात तुमच्या गुंतवणुकीचा कसलाही अंश उरणार नाही, तसेच तुम्हाला ऊर्जा आणि तेलाचे पूर्वीचे दर पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाहीत,” असे म्हणत त्यांनी अमेरिकेला त्यांची पूर्वीची धोरणात्मक आणि आर्थिक स्थिती पुन्हा कधीच गाठता येणार नाही असेही स्पष्ट केले. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी मित्र देशांकडून मध्यस्थीच्या माध्यमातून वाटाघाटीचे प्रयत्न सुरू असतानाच हे विधान करण्यात आले आहे.

आयआरजीसीच्या प्रवक्त्याने प्रदेशातील देशांना ‘अमेरकन, झायोनिस्ट राजवटीच्या’ विरोधात एकत्र येण्याचे आवाहन देखील केले. त्यांनी सुरक्षा भागीदार म्हणून अमेरिका विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “आम्हाला अशा दूर अंतरावर असलेल्या देशाची गरज नाही, जो इस्रायलला प्राधान्य देतो आणि तुम्हाला गुरांसारखी वागणूक देतो.”

“तुमच्या संरक्षणासाठी अमेरिकन लोक एखादी साधी गोळी तरी झाडतील का?” असा प्रश्न उपस्थित करत या प्रदेशातील अमेरिकेच्या सुरक्षेबाबतच्या वचनबद्धतेवर देखील शंका उपस्थित करण्यात आली आहे. आयआरजीसीच्या प्रवक्त्याने केलेले विधान हे प्रादेशातील देशांच्या सरकारांना उद्देशून देण्यात आलेल्या एका व्यापक संदेशाचा भाग आहे. इराणकडून हा संघर्ष फक्त दोन देशांतील नसून हा एक व्यापक भू-राजकीय संघर्ष असल्याचे दाखवले जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडू मुस्लीम राष्ट्रांच्या एकजुटीसाठी आवाहन केले जात आहे.

अमेरिकेबरोबर चर्चेचा दावा इराणने फेटाळला
अमेरिकेबरोबर कोणत्याही वाटाघाटी झाल्याचा दावा इराणने जाहीरपणे फेटाळला आहे. यादरम्यान आयआरजीसीच्या प्रवक्त्याचे विधान समोर आले आहे. वाटाघाटींच्या चर्चांबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिकेने इराणच्या अधिकाऱ्यांशी अत्यंत चांगली आणि फलदायी चर्चा केली आहे. या चर्चेचा मुख्य उद्देश मध्यपूर्वेतील संघर्ष पूर्मपणे संपवणे हा होता. ट्रम्प यांनी असेही नमूद केले की, या चर्चेत झालेली प्रगती पाहता त्यांनी इराणच्या पॉवर ग्रिडवर होणारा नियोजित हल्ला पाच दिवसांसाठी पुढे ढकलला असल्याचेही ट्रम्प म्हणाले होते.

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबफ यांनी चर्चा झाल्याचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “अमेरिकेबरोबर कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी झालेल्या नाहीत. आर्थिक आणि तेल बाजारपेठ ताब्यात ठेवण्यासाठी आणि अमेरिका व इस्रायल ज्या दलदलीत अडकले आहेत, त्यातून सुटका करून घेण्यासाठी फेक न्यूजचा वापर केला जात आहे,” अशी पोस्ट एक्सवर केली.

युद्धाचा शेवट होणार?
दमरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षावर तोडगा काढण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासन पावले उचलत असल्याचे समोर आले आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने सकारात्मकता दर्शवली आहे. अमेरिकेने संघर्ष थांबविण्यासाठी १५ मुद्दे पाकिस्तानच्या माध्यमातून इराणसमोर मांडले असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केले आहे. यामध्ये इराणने युरेनियमचे संवर्धन थांबवावे, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी आणि अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न बंद करावेत, अशा अटी या शांती प्रस्तावात ठेवण्यात आल्या आहेत. इराणकडूनही काही अटी ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.